तुमची चयापचय क्षमता वाढवण्यासाठी रोजच्या जीवनपद्धतीमध्ये बदल करणं नक्कीच आवश्यक आहे. तुम्ही किती कॅलरीज घेता आणि त्यावर नियंत्रण ठेऊ शकता यांवर हे अवलंबून आहे.
एकावेळी खूप खाऊ नका
एकावेळी मोजक्या प्रमाणात आहार घ्या आणि दर तीन तासांनी खा. तुम्ही खाता ते पदार्थ पौष्टिक आहेत याची खात्री करून घ्या. त्याने चयापचय क्षमता वाढते. खूप वेळ उपाशी राहू नका.
संतुलन साधा
धान्य, भाज्या आणि फळांतून कर्बोदके मिळतात तर दुध, अंडी, मटण, मासे, कडधान्ये यातून प्रथिने आणि तेल, सुका मेवा आणि बियांमधून चरबी मिळते त्यामुळे यांचा रोजच्या आहारात समावेश करायला हवा.
सजावटसुद्धा महत्वाची
काही वेळा पदार्थ कसा सजवला जातो हेही महत्वाचं ठरतं. नुसतं चिरलेलं सलाड खायचा कंटाळा येत असेल तर वेगवेगळ्या आकारात ते कापून बघा. पदार्थांवर थोडीशी कोथिंबीर घातली तरी लगेच त्यांचं रूप बदलतं.
खाताना वाचन नको
एकावेळी अनेक गोष्टी केल्याने त्या लवकर होतात पण खाताना मात्र काहीही करू नका. खाताना काही वाचू नका किंवा टीव्ही बघू नका. जेवणावर लक्ष केंद्रित करून सावकाश जेवा. अन्न चावून खा, तसेच गिळू नका. यामुळे पचनाला नक्कीच मदत होते.
वेळेत थांबवा
वजन नियंत्रणात ठेवण्याचा सर्वोत्तम उपाय खाण्यावर नियंत्रण. जेवताना कुठे पूर्णविराम देऊन जेवणं बंद करायचं हे लक्षात घ्या. पोट भरलंय असं वाटलं तर लगेच थांबा.
खरेदी करताना…
खरेदीला जाण्यापूर्वी पोटभर खाऊन जा. जेणेकरून बाहेरच्या पदार्थांचा मोह टाळता येईल. वस्तू आणि खाद्यपदार्थांचे लेबल नीट बघून घ्या.
पार्टीत सहभागी व्हा.
तुम्ही डाएट करत असाल तरी पार्टीत सहभागी व्हायला काहीच हरकत नाही. पार्टीला जाण्यापूर्वी पौष्टिक आहार घ्या. जेणेकरून तुम्हाला लगेच भूक लागणार नाही. पार्टीमध्ये डान्स करायची संधी सोडू नका. त्याने व्यायाम होऊन चयापचायला मदत होईल.
ग्रीन टी घ्या
ग्रीन टीमध्ये कॉफीपेक्षा कमी प्रमाणात कॅफेन असते. त्यामुळे कॉफीला पर्याय म्हणून हा चहा घ्यायला हरकत नाही. शिवाय यामुळे खायची इच्छा थोडी कमी होऊन खाण्यावर नियंत्रण राहील.
भरपूर पाणी प्या.
दिवसभरात ८ ते १० ग्लास पाणी कमीत कमी प्यायले गेलं पाहिजे. याशिवाय कलिंगड, संत्री, अननस, काकडी, टोमॅटो यांत पाण्याचं प्रमाण अधिक असल्याने त्यांचं सेवन व्हायला हवं.
उत्साही राहा
व्यायाम केल्यानंतर तुमची चयापचय क्षमता २५ % वाढू शकते. याशिवाय व्यायामाने चरबी कमी होते. आठवड्यातून कमीत कमी पाच वेळा पोहणे, चालणे, सायकल चालवणे किंवा जॉगिंग यापैकी कोणताही व्यायामप्रकार करा.